परतूर (जालना ) : जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील एका गल्लीचे नगर परिषद कार्यालयात पाकिस्तान गल्ली अशी नोंद करण्यात आली असून, या भागातील रहिवाशांना नगर पालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये या गल्लीचा नामोल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरामुळे शहरातील नागिरकांनी संताप व्यक्त केला आहे.
परतुर नगरपालिकेने काही महिन्यापूर्वी खासगी एजन्सीकडून शहरातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करून घेतले. या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक चुका झाल्याने या सर्वेक्षणानूसार ठरविण्यात आलेला मालमत्ता कराला नागरिकांनी विरोध केला असून, हे सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान नगर पालिकेने मालमत्ता धारकांना कराचा भरणा करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. यातील एका नोटीसमध्ये मोंढा परिसरातील एका नागरिकाच्या पत्ता चक्क ''पाकिस्तान गल्ली'' शनी मंदिर जवळ परतूर असा लिहण्यात आला आहे. त्यामुळे नोटीस आलेल्या नागरिकालाही शहरात पाकिस्तान गल्ली कधी झाली. असा प्रश्न पडला असून, या नव्या नामाकरणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान गल्लीची नोंद नगरपालिकेच्या दफ्तरात कधी करण्यात आली याबाबत आता संभ्रम निर्माण होत आहे. परतुर नगरपालिकेतील नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने सध्या नगरपालिकेवर प्रशासक आहे. यातच यातच निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने विरोधकही या चूकांचे भांडवल करू लागले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीसपरतुर शहरातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना मोंढा भागातील काही नागरिकांच्या नोटीस वर पाकिस्तान गल्ली असा उल्लेख झाल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या चुकीला नगरपालिकेतील एका बिल संकलकाला जबाबदार धरत मुख्याधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.