लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील पंचायत समिती कार्यालयातील रेकॉर्ड रुमला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. यात बांधकाम शाखेशी संबंधित घरकुल योजनेच्या जुन्या संचिका जळून खाक झाल्या. आगीच कारण स्पष्ट झालेले नाही.पंचायत समिती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कोपऱ्यात रेकॉर्ड रुम आहे. दुपारी दोनच्या सुमारास बंद रुममधून धूर येत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. रेकॉर्ड रूमचा दरवाजा उघडल्यानंतर आतील संचिकांना आग लागल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत काही संचिका जळाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी इमारतीमध्ये बसविलेल्या अग्निशमनविरोधी सिलिंडरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा एक बंद तात्काळ घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीत १९९० मधील घरकूल योजनेच्या सुमारे तीनशे संचिका जळाल्याचे सांगण्यात आले. आग नियंत्रणात आल्यानंतर रेकॉर्ड रुममध्ये अर्धवट जळालेल्या अनेक संचिका इमारतीच्या व्हरांड्यात ठेवण्यात आल्या होत्या.
पंचायत समितीच्या रेकॉर्ड रुमला आग
By admin | Published: July 12, 2017 12:36 AM