लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसह फळबागा नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.खोतकर यांनी सोमवारी प्रशासकीय अधिका-यांसमवेत शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांनी खचून जाऊ नये. आपण स्वत:, शिवसेना पक्ष व शासन तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे सांगत खोतकरांनी शेतक-यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, पं.स. सदस्य जनार्दन चौधरी, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, बाबा मोरे, तुळशीदास काळे, मुरलीधर शेजुळ, तुकाराम शेजुळ, मुरलीधर थेटे, शैलेश घुमारे, काशिनाथ जाधव, प्रभाकर सुळसुळे, गणेश शिंदे, आप्पासाहेब उगले, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.खोतकर यांनी गोलापांगरी येथील मनोज मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच कल्याण प्रकल्प सिडस येथे उध्वस्त झालेले कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांची पाहणी केली. जळगाव सोमनाथ, वखारी व धारकल्याण येथे भेटी देऊन बागांची पाहणी केली. दरम्यान, बाजीउम्रद येथील शेतकरी शिवाजी डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी शेतक-यांनीही आपल्या व्यथा खोतकरांसमोर मांडल्या.खरीप हंगामातील दमडीही शेतक-यांच्या हाती मिळाली नाही. खचलेल्या शेतक-यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली. मात्र दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने ही पेरणीही वाया गेली आहे. त्यामुळे पंचनामे करताना खरिपाबरोबर रबी हंगामातील पेरणी, पिकांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खोतकरांनी दिल्या.
पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:34 AM