धावडा ग्रामपंचायतीत १७ सदस्य आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकजण तुल्यबळ उमेदवार आपल्या पॅनलमध्ये रहावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. पूर्ण उमेदवार फिक्स झाल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. आरक्षित जागेवर जात पडताळणीचे प्रमाणपत्र प्राप्त सदस्यांचाही गावात वाणवा आहे. आरक्षित जागेवर तुल्यबळ उमेदवारही काही पॅलनचे अजून निश्चित झालेले नाहीत. धावडा येथे तीन पॅनल व काही अपक्ष आपापल्या सोयीच्या वाॅर्डात उभे राहण्याची शक्यता असून, या वेळच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. काही आजी-माजी व नवीन उमेदवारही ही ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास प्रयत्नशील असून, आपल्याला पॅनलमध्ये संधी मिळावी, यासाठीही अनेकांची धडपड सुरू आहे. सध्या तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात पॅनल प्रमुख दिसत आहेत. दरम्यान, धावडासह परिसरातील पोखरी-मेहगाव ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. भोरखेडा ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीसाठी बैठक बोलावली होती; परंतु काही ग्रामस्थ बैठकीला उपस्थित न झाल्याने बिनविरोधाची प्रक्रिया होऊ शकली नाही.
प्रस्तावावर पाणी
विझोरा येथे सात सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंचपद एससी महिलेसाठी राखीव निघले होते. त्याकरिता एका गटाचे तीन व दुसऱ्या गटाचे तीन उमेदवार बिनविरोध घ्यावेत, आरक्षित जागेच्या महिलेसाठी एससी मागासवर्गीय समाजाची बैठक बोलावून त्यांनी एका महिलेचे नाव द्यावे व त्यांच्यात एकमत न झाल्यास त्या एका जागेची निवडणूक घ्यावी, असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र, आरक्षण रद्द झाल्याने या प्रस्तावावर पाणी पडले.