जालना : पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक डॉ. विलास आहेर यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या २८३ व्या ऑनलाईन मासिक चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. आहेर यांनी जनावरांना अखाद्य वस्तू मुळे होणारे अपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना डॉ. आहेर म्हणाले की, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ३ डिसेंबर २००० रोजी झाली असून, त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. या विद्यापीठांतर्गत पाच महाविद्यालये असून, मुख्यालय नागपूर येथे आहे. जनावरांना अखाद्य वस्तूपासून शक्यतो दूर ठेवावे. अखाद्य वस्तूंमध्ये खिळा, सूई, चमडा, दोर, कपडे, तार यांचा समावेश होतो. या वस्तू् पोटात अडकतात व जनावरांना रोगी करतात. पोटफूगी, पोटाचा दाह, हरनिया या सारखे गंभीर आजार होतात. अघोरी उपाय जसे गळलिंबू पाजणे असे करू नये, यात वेळ वाया जातो व जनावरास गंभीर आजार जडतो, असेही ते म्हणाले.
परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कृषी शक्ती व यंत्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी यांनी शेतकऱ्यांना शेतीचे यांत्रिकीकरण व काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, जमिनीची मशागत करताना रोटाव्हेटरचे वापर कमी करणे गरजेचे आहे. रोटाव्हेटरचा अति वापरामुळे जमिनीचा टणकपणा वाढतो. त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी होते. त्याचा मुळाच्या वाढीवर परिणाम होऊन पिकांची उत्पादकता कमी होत असते. अशा जमिनीवर सबसॉयलर वापरावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती होती.