लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रतिपूर्तीची २०१७-१८ व २०१८-१९ यावर्षींची रक्कम त्वरित इंग्रजी शाळांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी इंग्रजी शाळा संस्थाचालक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा संस्थाचालकांची जिल्हा इंग्रजी शाळा संस्थाचालक समन्वय समिती ज्येष्ठ संस्थाचालक तथा मार्गदर्शक विठ्ठल म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजी शाळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याचे व एकही शाळा प्रतिपूर्तीच्या रकमेपासून वंचित राहणार नाही, असे गजानन वाळके व सचिन जाधव यांनी सांगितले. आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रतिपूर्तीची रक्कम त्वरित इंग्रजी शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदरील प्रतिपूर्तीची रक्कम आठ दिवसात न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी आठ दिवसांत प्रतिपूर्तीची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. या निवेदनावर गजानन वाळके, सचिन जाधव, विठ्ठल म्हस्के, फेरोझ सौदागर, अॅड. कैलास जारे, संजय काळबांडे, ज्ञानेश्वर बरबडे, रियाज शेख, डॉ. पांढरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
आरटीई २५ टक्के प्रतिपूर्ती रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:21 AM