जालना : मदत करण्याच्या हेतूने आलेल्या तिघांना चहापाण्यासाठी ५०० रुपये देणे एका व्यक्तीस चांगलेच महागात पडले आहे. काही वेळानंतरच कार थांबवून मारहाण करून २ लाख ४९ हजार रुपये लंपास करणाऱ्या तिघांना तालुका जालना पोलिसांनी गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. संदीप जितेश लिधोरे (रा. वलीमामू दर्गा), रामेश्वर ऊर्फ लकी दिलीप कावळे (रा. मोगलाई गल्ली), रोहित ज्ञानेश्वर नन्नवरे (रा. वलीमामू दर्गा), अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५,५०० रुपये रोख आणि गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी, दोन मोबाइल, असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मेहकर येथील नागेश सोनोने हे कारने मेहकरकडे २ लाख ४९ हजार रुपये घेऊन जात चालले होते. नाव्हा चौफुली येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम तेथे आले. तुम्हाला काही मदत लागत असेल, तर आम्ही मदत करू, असे ते फिर्यादीस म्हणाले. त्यानंतर फिर्यादीने त्यांना ५०० रुपये काढून दिले. काही वेळानंतर तिघांनी कार अडवून फिर्यादीला मारहाण करून २ लाख ४९ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांना ताब्यात घेतले, तर एक संशयित जयेश राजपूत (रा. गांधीनगर) हा फरार झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जनार्दन शेवाळे, पोउपनि किशोर वनवे, नागसेन भताने, चंद्रकांत माळी, राम शेंडीवाले, अशोक राऊत यांनी केली आहे.
पिस्तूल दाखवून लुटणारा अटकेततालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयित सागर डुकरे व त्याचे दोन साथीदार फरार होते. त्यातील सागर डुकरे यास पोलिसांनी अटक केली आहे.