लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समृद्धी महामार्गात जाणा-या झाडांचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकाणा-या तालुका कृषी अधिका-यांसह तीन खाजगी व्यक्तींना मंगळवारी रात्री जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. दरम्यान, कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे (४८), बालासाहेब ज्ञानोबा वाघमारे (४३) व सुभाष गणपत खाडे (४०) यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तिघांची ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात तक्रारदाराची अहंकार देऊळगाव (ता. जालना) येथील शेती संपादित झाली आहे. संपादित जमिनीवरील झाडांचे कृषी विभागाकडून तीन कोटी एक लाखांचे मूल्यांकन काढण्यात आले होते. मात्र, तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, मूल्यांकन दोन कोटी सतरा लाख रुपये दाखविण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने झाडांचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यासाठी २० लाखांची मागणी करण्यात आली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी उर्वरित १५ लाख रुपये देण्यासाठी मंगळवारी भेटण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने उड्डाणपुलाखाली सापळा लावला असता, संशयित अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांना तक्रारदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यानंतर जालना तहसीलच्या परिसरातून तालुका कृषी अधिकारी रोडगे यांना ताब्यात घेण्यात आले. प्रकृतीच्या कारणामुळे अनंत बाबूराव नाल्टे उर्फ माने (६८) यांना औरंगाबादेत रुग्णालयात दाखल केले. रोडगेसह तिघांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
कृषी अधिका-यासह तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:42 AM