गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण घटल्याने ही एक समाजासाठीदेखील सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
वर्षभरापासून आम्ही दिवस उगवला की, स्मशानात जात असू. प्रारंभी आम्ही केवळ दहा जण होतो. परंतु मयतांची संख्या वाढू लागल्याने आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी अधिकचे कर्मचारी वाढवून दिले. त्यामुळे येणारा ताण हलका झाला होता. त्यातच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे, गोवऱ्या लागत असत, त्याची टंचाईदेखील शहरातील दानशुरांच्या मदतीतून कमी झाली होती. गुरूवारी केवळ दोन मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वानखेडे म्हणाले.
घरच्यांची मोठी साथ मिळाली
आजपर्यंत आम्ही २५ कर्मचारी हे सकाळी उठल्यावर लगेचच स्मशानाची वाट धरत होतो. अनेकवेळा घरच्यांकडून याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. परंतु आम्ही त्यांना समजावून सांगत अंत्यसंस्कार हे सर्वात पुण्याचे काम मानले जाते. लग्ना दारी की, मरणा दारी ही आपल्याकडे म्हण रूढ आहे. त्यामुळे जेवढे दु:ख हे मयतांच्या नातेवाईकांना होत होते. त्यापेक्षा कितीतरी दु:ख हे आम्हाला होत होते. अशा स्थितीत कुटुंबाची जी साथ मिळाली ती मोलाची होती.
अरूण वानखेडे, पालिका कर्मचारी, जालना