दीपक ढोले, जालना : मित्राला फोनपेद्वारे १ हजार रुपये ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून मोबाइल घेतला. त्याने एक हजारऐवजी एक लाख रुपये ट्रान्सफर केले. त्याच पैशात ऑनलाइन गेम खेळणाऱ्यास सायबर पोलिसांनी शनिवारी भोकरदन येथून ताब्यात घेतले आहे. युवराज अंबादास इंगळे (रा. विळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
मलकापूर येथील साईनाथ वाघमारे यांचे ग्राहक सेवा केंद्र आहे. २६ सप्टेंबर रोजी एका अनोळखी इसम त्यांच्याकडे आला. मला मित्राला हजार रुपये ट्रान्सफर करायचे आहे, असे म्हणाला. क्रमांक टाकण्यासाठी त्याने मोबाइल घेतला. साईनाथ वाघमारे हे काम व्यस्त होते. त्याचवेळी त्याने एक हजारांऐवजी एक लाख रुपये ट्रान्सफर केले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी युवराज इंगळे हा असल्याचे निष्पन्न झाले. शोध घेऊन त्याला भोकरदन येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, सिमकार्ड असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणूक केलेली रक्कम आरोपीने ऑनलाइन गेममध्ये उडविली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, सफौ. पाटोळे, पोहक, राठोड, बाविस्कर, वाघुंडे, पोना. मांटे, पोशि. गुसिंगे, पोशि. भवर, पोशि. मुरकुटे यांनी केली आहे.