जालना : गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तिसऱ्या दिवशी पथकाने जालना तालुक्यातील देवमुर्ती येथे छापा टाकून एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त केले आहे. विठ्ठल पंडितराव जाधव (रा. देवमुर्ती, ता. जि.जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने वर्षभरापूर्वी जालना येथील एसआरपीएफ ग्रुप तीन मधील संशयित बबन ऊर्फ विशाल वाघ याच्याकडून सदरील पिस्टल खरेदी केल्याचे समोर आले आहे.
देवमुर्ती शिवारात संशयित विठ्ठल जाधव हा अवैधरित्या पिस्टल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सदरील इसमाचा शोध घेतला असता, तो देवमूर्ती येथील बसस्थानक परिसरात मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३५ हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्टल, १२०० रूपये किंमतीचे जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने सदरील पिस्टल व काडतुसे ही जालना येथील एसआरपीएफ ग्रुप-तीन मधील जवान संशयित बबन ऊर्फ विशाल वाघ याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, रामप्रसाद पव्हरे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय वाघुंडे, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास्तव, अक्रूर धांडगे, भागवत खरात, रवी जाधव, योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, सचिन राऊत, चालक संजय राऊत, सौरभ मुळे यांच्या पथकाने केली.