जालना : अवैध रित्या गावठी पिस्तुल व तलवार बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या आदेशानुसार जालना शहर व परिसरात सोमवारी रात्री कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना चंदनझिरा भागात एक इसम कारमधून अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पथकाने चंदनझिरा भागात पहाटे २ वाजेच्या सुमारास सापळा रचला. अवैध शस्त्रे घेऊन येणारी कार येताच पोलीस निरीक्षक गौर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवर झडप घालून कारवाई केली. कार (एमएच-०१, एव्ही-०९०३) ची झाडाझडती घेतली असता, एक गावठी पिस्तुल आणि एक धारदार तलवार आढळून आली. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) यास ताब्यात घेऊन कारसह एक गावठी पिस्तुल व तलवार, असा ३ लाख ११ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.