औरंगाबाद : औरंगाबादेतील पीटलाइन नावालाच मंजूर असून, जालन्याने पीटलाइनच्या बाबतीत काहीशी गती पकडली आहे. जालन्यात कोच देखभाल सुविधेच्या विकासासह प्राथमिक विद्युत कामे, विद्युत युनिटचे स्थलांतर इ. कामांसाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध झाली.
औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाइनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाइन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाइन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतला. त्यापाठोपाठ चिकलठाण्यातच पीटलाइन व्हावी, या मागणीसाठी चिकलठाणा येथील ग्रामस्थही पुढे आले.
औरंगाबादेतील चिकलठाणा येथील पीटलाइन जालन्याला पळविण्यात येत असल्याची ओरड होत असताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा दिला. या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु प्रत्यक्षात औरंगाबादेत पीटलाइन होण्याच्या दृष्टीने कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याची ओरड होत आहे. दुसरीकडे जालन्यात कोच देखभाल, सुविधेच्या विकासासह प्राथमिक कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे.
आता औरंगाबादची पीटलाइन मार्गी लावाजालन्यात पीटलाइनच्या प्राथमिक कामकाजासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. जालन्यातील पीटलाइन मागणी मार्गी लागून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता औरंगाबादच्या पीटलाइनचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य द्यावे. औरंगाबादला त्याची गरज आहे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक