लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यातील टेंभूर्णी येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची उप लोकआयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणारा फकीरचंद केदार खंडेकर (रा.टेंभूर्णी) हा फसवणुकीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे.ग्रामपंचायत कार्यालय टेंभूर्णी यांनी लोकआयुक्तांच्या आदेशान्वये मालकी हक्कात महाराष्ट्र शासन आणि भोगवट्यात वास्तव्यास असणाऱ्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली आहे. याची तहसीलकडून मिळालली प्रमाणपत्रे व ताबा पावत्यांबाबत शंका व्यक्त करून प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करावी, असे कळविले होते. तहसीलने प्रमाणपत्रांची फेरतपासणी केली असता, तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्ष-या असल्याचे समोर आले. तसेच हे प्रमाणपत्र लाभार्थींनी स्वत: हून न घेता पैसे देऊन फकीरचंद खंडेकर यांनी दिले असल्याची कबुली पोलिसात दिली आहे. या फसवणूक प्रकरणी खंडेकरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचा नियमबाह्य फायदा घेतल्यामुळे चौकशी अहवालानुसार फकीरचंद खंडेकर व शांताबाई फकीरचंद खंडेकर यांनी शासनाची ५१ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई केल्याचे तहसीलदार जे. डी. वळवी यांनी सांगितले.
आयुक्तांकडे तक्रार करणाराच आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:54 AM