जालना : जालना जिल्ह्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यासह दोघांविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री एका शासकीय विश्रामगृहात घडली.
एक उच्चपदस्थ अधिकारी शासकीय विश्रामगृहात भावासोबत थांबल्या होत्या. त्या सोमवारी रात्री विश्रामगृहात येण्यापूर्वीच त्यांच्या खोलीत दोघेजण बसले होते. संबंधित महिला अधिकाऱ्याने विचारणा केल्यानंतर त्यापैकी एकाने आपण भाऊसाहेब गोरे असून, तुम्ही मला ओळखत नाही. मी आमदार लेव्हलचा माणूस आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला आलो, असे सांगितले. त्या महिला अधिकाऱ्याने सहकार्याची गरज नाही, असे म्हणत त्यांना खोलीबाहेर जाण्यास सांगितले. यावेळी गोरे व त्याच्या सहकाऱ्याने तेथेच थांबून लज्जा वाटेल असे कृत्य केले.
या घटनेने घाबरलेल्या त्या महिला अधिकाऱ्याने जालना शहर गाठून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कदीम पोलिस ठाण्यात संबंधित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब गोरे व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध झिरोने गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो गुन्हा संबंधित ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.