लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : तपोवन तांडा (ता.भोकरदन) येथील एका मुलाने मुलीस पळवून नेले, मुलाच्या साथीदारांनी चिमुकल्या मुलीच्या अंगावर मोटारसायकल घातली, पत्नीस बेदम मारहाण केली तरीही पोलीस काहीच कारवाई करत नाही, असा आरोप करत मुलीच्या आईसह नातेवाईकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत राजूर पोलीस चौकीत ठिय्या मांडला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण निवळले.तपोवन तांडा येथील एका मुलाने शुक्रवारी एका मुलीस पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी राजूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. या मुलीचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी पळवून नेणा-या मुलाच्या साथीदाराने तपोवन तांड्यावर घरासमोर खेळणा-या चिमुकलीच्या अंगावर दुचाकी घालून जखमी केले. त्यानंतर हे कुटुंब राजूर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना मुलाच्या साथीदाराने रस्त्यात अडवून मारहाण केली. पोलीस अन्याय करणा-यांना मदत करतात, असा आरोप करून मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी राजूर चौकीत ठिय्या मांडून आक्रोश केला. यावेळी जखमी महिलेस कुणीही दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते. आरोपींना अटक करा तरच उपचार घेऊ, असा पवित्रा या कुटुंबियांनी घेतला. दुपारपासून सुरू असलेल्या गोंधळाने चौकीत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने या महिलेला रुग्णवाहिकेतून जालन्याला उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत हसनाबाद ठाण्याचे सपोनि किरण बिडवे यांना विचारले असता, वार्षिक तपासणी असल्यामुळे चौकीतील काही कर्मचा-यांना हसनाबादला बोलावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
पोलीस चौकीत फिर्यादींचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:47 AM