पादचाऱ्यांची गैरसोय
मंठा : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नगर पंचायतीने बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
बहरलेल्या पिकांना पावसाची गरज
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बहरात असलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पावसाच्या आशेवर पहिली पेर वाया गेल्याने नाईलाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पाऊस काही नियमित येईनासा झाल्याने दुबार पेर वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावली
राजूर : येथील शेतकरी कैलास हिरगुडे यांच्या लोणगाव शिवारातील शेतात सोमवारी दुपारी कोळपणीची कामे सुरू होती. दरम्यान, शेतातील खांबाला आधार देणाऱ्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. या तारेला लोखंडी औताचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून बैलजोडी दगावली आहे. यात कैलास व त्यांचे भाऊ विलास या दोघांनाही विजेचा धक्का लागला. ते बाजूला फेकले गेले.
रोजगार मेळाव्याला तरुणांचा प्रतिसाद
परतूर : परतूर तालुक्यातील मांडवा देवी संस्थानात सोमवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसचे युवा नेते नितीन जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक गजानन चवडे, योगेश मुळे, लक्ष्मण टेकाळे यांची उपस्थिती होती. मेळाव्यात विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुरेश गवळी, वैजनाथ गवळी, नारायण खोसे हे हजर होते.
पारध - पिंपळगाव रेणुकाई रस्ता उखडला
पारध : येथील पारध - पिंपळगाव रेणुकाई हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात उखडला गेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच उर्दू शाळा ते पारध या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन महिन्यातच रस्ता उखडला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे पुन्हा काम करून द्यावे नसता, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.