विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली. शासनस्तरावरूनच अपुरा निधी येत असल्याने जेवणासह इतर सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे घरचा डबा खाऊनच विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवरही कसब पणाला लावावे लागते.जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर १६ व १७ आॅक्टोबर रोजी विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. या क्रीडा स्पर्धेत जालन्यासह औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली या पाच जिल्ह्यातील शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, नेहमीप्रमाणे स्पर्धेच्या वेळी मुक्कामाची सोय होणे अपेक्षित नसल्याने अनेक शिक्षकांनी खाजगी वाहनातून १२५ ते १५० किलोमीटर अंतरावरून खेळाडूंना आणले होते. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या आवारात दोन दिवस खासगी वाहनांची गर्दी दिसून आली. त्यात अपुऱ्या निधीमुळे जेवणाची सोय उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे विभागीय स्पर्धेच्या दरम्यान जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया खेळाडूंसह शिक्षकांना मिळालेल्या वेळेत घरून आणलेल्या डब्याचाच आधार घ्यावा लागला.जालना येथील क्रीडा संकुलाची डागडुजीही रखडली आहे. थोडाही पाऊस झाला की, मैदानावर चिखल होतो. काही भागांत पाणी साचते. सुदैवाने दोन दिवसात पाऊस झाला नसल्याने विभागीय स्पर्धेतील खेळाडूंना आपले कसब पणाला लावता आले. मात्र, जेथे रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते. तेथे काही भागात खडी मोठ्या प्रमाणात होती. अनेक खेळाडू विशेषत: मुलीही अनवाणी पायाने जिंकण्यासाठी धावत होत्या. ही खडी तुडवत आणि त्या खडीचा त्रास सहन करीतच अनेकांनी जिंकण्यासाठी कसब पणाला लावले. दुसरीकडे क्रॉस कंट्रीत एकाच वयोगटात खेळाडूने वर्षभर खेळायचे, या नियमावरूनही बुधवारी काहीसा संभ्रम प्रशिक्षक आणि आयोजकांमध्ये झाल्याचे दिसून आले. एकूणच क्रीडा विभागाकडूनच अपुºया प्रमाणात निधी दिला जात असल्याने खेळाडूंना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. त्यामुळे पदकांची अपेक्षा करायची किती आणि ही पदके मिळणार कशी, असाच प्रश्न क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.क्रीडा धोरण कागदावरदर्जेदार खेळाडू घडावेत, खेळाडूंना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी क्रीडा धोरण जोमात राबविले जाते.मात्र, स्थानिक पातळीवरील क्रीडा संकुल असोत किंवा खेळाडूंना मिळणा-या सोयी-सुविधा असोत, या बाबी पाहता क्रीडा धोरण केवळ कागदावरच राहत असल्याचे चित्र प्रत्येक जिल्ह्यात आहे.जिल्हा क्रीडा संकुलाचीच वाट लागलेली आहे. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलावरील परिस्थितीचा विचार न केलेलाच बरा ! अशीच स्थिती जालना जिल्ह्यातही आहे.केवळ तीन प्रकारांत भागअनेक मैदानी, सांघिक स्पर्धेत गुणवत्ता सिध्द करण्याचे कसब खेळाडूकडे असले तरी त्याला केवळ तीनच क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याचा नियम आहे. त्यामुळे क्षमता असूनही अनेक खेळाडू इतर क्रीडा प्रकारात किचकट नियमामुळे सहभागी होऊ शकत नसल्याची खंत अनेक खेळाडू, शिक्षकांनी व्यक्त केली.
खेळाडूंना घरच्या डब्याचा आधार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:50 AM