लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणारी टाटा सुमो पकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षकांच्या पथकाने मंगळवारी रात्री जालना-मंठा मार्गावर केली.परभणीकडून सेवली येथे एका टाटा सुमोमधून अवैधरीत्या धुलीवंदन सणानिमित्त विक्री करण्यासाठी विदेशी दारू आणण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या विशेष पथकाला मिळाली होती.यामुळे पथकाने मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जालना ते मंठा मार्गावर सापळा लावला होता, मात्र, पोलीस पथकाची चाहूल लागल्याने टाटासुमो चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन टाटा सुमो (क्रमांक एम.एच. २३, एडी.२३६२) पकडली.गाडीत विदेशी दारूच्या २४ हजार ६५० रुपयांच्या १७० बाटल्या आढळून आल्या.यावेळी पोलिसांनी विदेशी दारू आणि २ लाख ५० हजाराची जीप, असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी जीपचालक महेश रत्नाप्पा डुमे (रा. सेवली) याच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.४० हजारांची दारू पकडलीशहागड : अंबड तालुक्यातील ढाकलगाव बीड-जालना राज्य महामार्गावरील युवराज ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारुन ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना परिसरात विनापरवाना ढाब्यावर देशी विदेशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार संजय मगरे, रामेश्वर बघाटे यांनी पथकासह युवराज ढाब्यावर छापा टाकला देशी-विदेशी दारूच्या २५० बाटल्या जप्त केल्या.
पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:20 AM