जालना : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून व्हिडिओ व्हाॅटस्ॲपवर प्रसारित करून बदनामी करणाऱ्यास सायबर पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
शेख अनिस शेख गफार (रा. मुरूमखेडा, ता. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. मुरूमखेडा येथील प्रवीण ज्ञानदेव साबळे यांनी ग्रामस्थांचा एक व्हाॅटस्ॲप ग्रुप तयार केला होता. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये कोरोनाबाबत एक संदेश प्रसारित केला होता. या संदेशाच्या व्हिडिओमध्ये शेख अनीस शेख गफार याने छेडछाड करून अश्लील व्हिडिओ साबळे यांच्या व्हाॅटसॲप ग्रुपवर प्रसारित केला. शेख याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्लील व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केल्याची तक्रार प्रवीण साबळे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार शेख अनिस शेख गफारविरुध्द मार्च- २०२१ महिन्यात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पंतप्रधानांच्या बदनामी प्रकरणाचे गांभीर्य पाहता, सायबर पोलिसांनी कारवाई करून बुधवारी शेख अनिस शेख गफार याला जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोनि. मारुती खेडकर, सपोनि. देशमुख, पोहेकॉ सुधीर गायकवाड, पोना अंबादास साबळे, सतीश गोफणे, लक्ष्मीकांत आडेप, शेख रईस, बाळू राठोड, पोकॉ योगेश सहाणे, शेख इरफान, महिला कर्मचारी संगीता चव्हाण, अर्चना आधे, सीमा चौधरी, रेखा घुगे आदींनी केली.