शहागड/ वडीगोद्री (जि.जालना) :अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत.मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबड तालुक्यातील २२ गावांमध्ये आज बंद पाळण्यात आला. तसेच गेवराई (ता.बीड) तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारून या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी गावापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर- सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत असल्याचे सांगितले होते. परंतु, जरांगे यांनी आजवर आश्वासनाशिवाय काही हाती पडले नसल्याचे सांगत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरातील आपेगाव ते हसनापूरपर्यंतच्या २२ गावांनी कडकडीत बंद पाळून आपला सहभाग नोंदविला. शिवाय गेवराई तालुक्यातील अनेक गावांनीही या बंदमध्ये सहभागी होत गावातून अंतरवाली सराटीपर्यंत दुचाकी रॅली काढली होती.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलीसलग चौथ्या दिवशी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.
अचानक वाद अन पोलिसांचा लाठीचार्जउपोषणकर्त्यांना उपचारासाठी नेण्याच्या कारणावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये सायंकाळी अचानक वाद निर्माण झाला. यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यात १० ते १५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह असंख्य आंदोलक जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून, आश्रुधारांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर अंतरवाली सराटी परिसरातील वातावरण चिघळले असून, वाहनांवर दगडफेक केली जात आहे.