लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्टेबल कृष्णा राऊत याच्या विरूध्द तक्रार आल्यावरून येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सकाळी सापळा लावला होता. मात्र, आपल्या विरूध्द कुठलातरी कट रचला जात असल्याचे लक्षात येताच राऊत याने पंचाच्या गळ्यातील कॉलर माईक घेऊन धूम ठोकली.या संदर्भात लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, एका गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस कर्मचारी कृष्णा राऊत याने दहा हजार रूपयांची लाच मागितली होती. परंतु संबंधित संशयित आरोपीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची माहिती लाचलुचपत विभागाकडे दिली.या माहितीवरून जालन्यातील पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ काशिद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. तक्रारदार आणि कृष्णा राऊत यांच्यातील संभाषण रेकॉडींग करण्यासाठी तक्रारदारासह लाचलुचपत विभागाने नेमलेल्या पंचाच्या कॉलरला मायक्रो माईक लावला होता. त्यांचे संभाषण सुरू असतानाच पोलीस कर्मचारी राऊत याच्या लक्षात आले की, आपल्या विरूध्द कुठलातरी कट रचला जात आहे.हे लक्षात येताच राऊत याने लाचलूचपत विभागाच्या पंचाच्या गळ्यात असलेल्या माईक हिसकावून ठाण्यातून पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली.या संदर्भात सायंकाळपर्यंत कृष्णा राऊत याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. या वृत्ताला लाचलूपत विभागाने दुजोरा दिला आहे. मात्र, वरिष्ठांकडून ज्या सूचना प्राप्त होतील, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस शिपायाची एसीबीच्या हातावर तुरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:28 AM