जालना : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७ लाखांसह तिजोरी चोरट्यांनी लांबविली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत लावला असून, मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे.
पानेवाडी येथे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी शाखा आहे. त्या शाखेतील तिजोरीत जवळपास साडेसात लाख रुपये होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी ही संधी साधत चक्क तिजोरीच पळवली होती. चोरीचे चित्रीकरण होऊ नये यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्हीची तोडफोड करून डिव्हाईस चोरले. ही चोरी झाल्याची तक्रार बँक व्यवस्थापाने पोलिसांकडे दिली. दरम्यान याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गौर, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कुरेवाड, देशमुख, मगरे, कायटे, बगाटे, गडदे, सागर बावीस्कर, कृष्णा तंगे, चौधरी, फलटणर, उबाळे, मांटे, जाधव, चेके, जायभाये आणि पैठणे यांचा समावेश आहे.
तिजोरीत होते सात लाख २८ हजार चोरट्यांनी जी तिजोरी पळवली होती तिच्यात सात लाख २८ हजार रुपये होते. पोलिसांनी आरोपीकडून बँकेची तिजोरी, चोरीसाठी वापरलेली जीप व दुचाकी जप्त केली. तसेच चोरीच्या पैशातून घेतलेला टीव्ही गजानन शिंगाडे याच्याकडून जप्त केला. पोलिसांनी एकूण सहा लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जालना येथील शिकलकरी मोहल्ला परिसरात शनिवारी अचानक छापा टाकून हरदीपसिंग बबलूसिंग टाक याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे सहकारी गोपीसिंग मलखामसिंग कलाणी, किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक, गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव) यांना ताब्यात घेतले.
खदानीतून काढली तिजोरीचोरट्यांनी बँकेतून चोरलेल्या तिजोरीतील रक्कम काढून घेतली. त्यानंतर ती तिजोरी शहरातील द्वारकानगरच्या मागे असलेल्या खदानीत फेकून दिली होती. पोलिसांनी जेसीबीच्या सहायाने ही तिजोरी खदानीतून बाहेर काढली.
चोरलेल्या चारचाकीचा वापरपानेवाडी येथील शाखेतील तिजोरी आणण्यासाठी चोरट्यांनी चोरलेल्या जीपचा वापर केला. ती जीप जालना शहरातील श्रीकृष्णनगर, संभाजीनगर येथून चोरण्यात आली होती. या प्रकरणात सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. चोरीची ही जीपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
एकाने घेतली दुचाकी, दुसऱ्याने घेतली एलईडीतिजोरीतून रक्कम काढल्यानंतर ती वाटून घेण्यात आली. वाट्याला आलेल्या रक्कमेतून एकाने दुचाकीची खरेदी केली होती. तर दुसऱ्याने एलईडी टीव्ही खरेदी केला होता. त्या दुचाकीसह एलईडी टीव्हीही पोलिसांनी जप्त केला आहे.