जालना : केंद्र शासनाच्या दूरसंचार व दळणवळण विभागाच्या वतीने हरवलेले, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. त्याचा वापर करीत सायबर पोलिसांसह विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेत सहा महिन्यांत २५२ मोबाईल शोधले आहेत. शोधलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलबाबत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध पोलिस ठाण्यात मोबाईल हरवलेले, चोरीस गेलेल्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोर्टलचा आधार घेत तांत्रिक पद्धतीने शोध घेवून सहा महिन्यात २५२ मोबाईल जप्त केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर ते मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल शोधण्यामध्ये सायबर पोलिस ठाणे आघाडीवर आहे.
सायबर पाेलिसांनी शोधलेले मोबाईल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते तक्रारदारांना देण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. संभाजी वडते, सफौ. पाटोळे, पोहेकॉ. राठोड, हिवाळे, निकम, मांटे, भवर, गुसिंगे, मुरकुटे, पालवे, नागरे, दुनगहू आदींच्या पथकाने केली.