लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ओळखपत्रामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसह इतर प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी नाशिक येथे कार्यरत असताना ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविला होता. या ओळखपत्रामुळे ज्येष्ठांची सुरक्षा, त्यांचे प्रश्न यासह इतर बाबी सोडविण्यास मदत झाली होती. हा उपक्रम जालना जिल्ह्यातही राबविण्याबाबत सिंघल यांनी मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ठाणेस्तरावर ज्येष्ठांची माहिती संकलित केली जात होती.सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांच्यासह पोना कडुबा सोनुने, पोकॉ रवी देशमुख व त्यांच्या टीमनेही ठाण्यांतर्गतच्या ज्येष्ठांची माहिती संकलित केली आहे. त्यांनी तयार केलेल्या ५२ ज्येष्ठ नागरिकांना रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते मंगळवारी ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांची उपस्थिती होती. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होेत आहे.पोलीस दलाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रावर ज्येष्ठ नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक, पोलीस दलाचा संपर्क क्रमांक, व्हॉटस्अॅप नंबर, पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांकाचा उल्लेख करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील ज्येष्ठांसाठी पोलिसांचे ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:58 AM