लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील सकलेचानगर भागातील एका राजकीय पक्षाचा नेता चालवत असलेल्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांनी सोमवारी रात्री आठच्या सुमारास धाड टाकली. या वेळी जुगार खेळणारे एसआरपीएफचे तीन जवान, एक टीसी, सरपंच व व्यापारी, अशा २० जणांना पोलिसांनी अटक केली. कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्यासह आठ दुचाकी, एक कार, फर्निचर असा दहा लाखांचा मु्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगरात नूरखान प्री-प्रायमरी सेमी इंग्रजी स्कूल आहे. या शाळेच्या वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मिळाली होती. जुगा-यांना रंगेहाथ पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक काही दिवसांपासून या पसिरात पाळत ठेवून होते. सोमवारी साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह जुगार अड्डयावर धाड टाकली. शाळेच्या दोन वातानुकूलित खोल्यांमध्ये मद्यापानासह जुगाराचा खेळ सुरू होता. विशेष म्हणजे एससीसाठी वीजही चोरून घेतली होती. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक पोकळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, शेख रज्जाक, विनोद गडदे, गोकुलसिंग कायटे, सचिन चौधरी, सँम्युअल कांबळे, सदा राठोड, समाधान तेलंग्रे यांच्यासह अन्य कर्मचारी कर्मचारी सहभाग होते.जुगा-यांमध्ये मुख्य संशयित नूरखान पठाण यांच्यासह शेख मंहमद शेख बुढन (रा.मस्तगड), शेख कदीर शेख रहिमोद्दीन (रा.नरीमाननगर), सुरेश चंदूलाल कक्कड (रा.मस्तगड), शेख युनुस शेख इस्माईल (रा. रेल्वेस्टेशन), जगन्नाथ माधवराव नागरे (रा.संभाजीनगर), शाहू कचरू धोत्रे (रा.माळीपुरा), नरेश पुरूषोत्तम अग्रवाल (रा.रेल्वे स्टेशन), संजय दत्तुलाल अग्रवाल (रा.शिवाजी पुतळा), शेख अल्लाहुद्दीन शेख कासीम (रा.रामनगर), शेख शब्बीर शेख इब्राहिम (रा.निवांत हॉटेल जवळ), रावसाहेब देवराव इंगोले (रा.धारकल्याण), कैलास सदाशिव गायकवाड (रा. ढोरपुरा), संदीप एकनाथ सराफ (रा.कावडपुरा गल्ली), कुणाल शिवाजीराव शिंदे (रा.मस्तगड), सचिन रूपचंद सांबरे (रा.शिवाजीनगर),संजय गिरमाजी कापुरे (रा. नवजिवननगर), गजानन दिनकर मोरे, भीमराव अर्जुनराव गायके, बालाजी बंडुजी कांबळे (तिघे एसआरपीएफ जवान ) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात एका वाहनातून नेण्यात आले.शहरातील अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे लोकमतने वारंवार प्रभाविपणे निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
राजकीय नेत्याच्या सेमी इंग्रजी शाळेत चक्क जुगाराचा अड्डा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:00 AM