लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कदीम पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले.भागूजी बजाजी पांढरे (५४, रा. पोलीस वसाहत जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदारच्या मुलाविरुध्द एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात ज्यांच्या मुला विरूध्द ही तक्रार दाखल होती, त्यांना पांढरे याने मोबाईल करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तसेच जर तुमच्या मुलाची नोकरी वाचवायची असेल तर, पाच लाख रूपये द्यावेत अशी मागणी केली. संबंधितांनी आम्हाला मुलाविरूध्द काय अर्ज केला आहे, हे दाखवावे अशी विनंती केली, मात्र ती विनंती पांढरे यांनी धुडकावून लावली.पाच लाख रूपये न दिल्यास मुलाविरूध्द ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे धमकावले. हा गुन्हा दाखल झाल्यावर मुलाला अटक होऊन कारागृहाची हवा खावी लागेल.यामुळे मुलाची नोकरी देखील धोक्यात येईल असे सांगून दहा हजार रूपये अॅडव्हान्स द्यावेत असे ठरले. त्यानुसार तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाणा परिसरात लाच देण्याचे ठरले.यावेळी पांढरे याला दहा हजार रूपये तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांना लगेच अटक करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. परोपकारी, पोलीस उपाधिक्षक निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी यशस्वी केली.
लाच घेताना पोलीस जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:33 AM