विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पोलीस दलाच्या वेबसाईटवरील अद्ययावत न होणारी माहिती, विशेषत: मराठीतून वेबसाईट पाहताना ‘कॉन्टॅक्ट अस’वर क्लिक केल्यानंतर दर्शविले जाणारे ‘संपर्क अमेरिका’ याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत पोलीस दलाच्या वतीने वेबसाईट दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘संपर्क अमेरिका’ ऐवजी आता ‘संपर्क जालना पोलीस’ दर्शविण्यात आले असून, ठाणेस्तरावरील काही अधिकाऱ्यांची नावेही बदलण्यात आली आहेत.गुन्ह्यांचे बदलणारे स्वरूप आणि दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने इंटरनेटसह इतर आधुनिक माध्यमांचा वापर केला जातो. मात्र, जिल्हा पोलीस दलातील वेबसाईटवरील माहितीच अद्ययावत करण्याचे काम केले जात नाही. विशेषत: मराठी भाषा निवडून वेबसाईटची पाहणी करताना ‘कॉन्टॅक्ट अस’वर क्लिक केल्यानंतर चक्क ‘संपर्क अमेरिका’ आणि ‘अबाऊट अस’ मध्ये ‘विषयी एसपी आॅफिस जालना’वर क्लिक केल्यानंतर ‘विषयी अमेरिका’ असा मथळा येत होता. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाची माहिती येत होती. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असताना वेबसाईटवर जुन्याच अधिकाºयांची नावे त्या ठाण्यासमोर दिसून येत होती. याबाबत ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ‘पोलीस वेबसाईटवर ‘संपर्क अमेरिका’..!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल तात्काळ घेत पोलीस दलाच्या वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘कॉन्टॅक्ट अस’वर क्लिक केल्यानंतर आता ‘संपर्क जालना पोलीस’ असा मथळा येत असून, त्यानंतर संपर्क क्रमांक येत आहेत. बदली झालेल्या काही अधिकाºयांची नावेही बदलण्यात आली आहेत.जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईट दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ही वेबसाईटही नाविन्यपूर्णपणे अद्यावत करून सर्वच विभागातील अधिका-यांची नावे, छायाचित्र, कार्यालयाचे फोटो, संपर्क क्रमांकासह सर्वसामान्यांना आवश्यक असलेली माहिती अद्ययावत करण्याची गरज आहे. शिवाय दाखल गुन्हे, उघडकीस येणारे गुन्हे, वाहन चोरी, बेपत्ता, अपहरणासह इतर घटना, घडामोडींची अद्ययावत माहिती, तपासाची माहितीही वेळोवळी अद्ययावत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पोलीस दलाच्या वेबसाईट बदलाचे काम गत दोन दिवसांपासून केले जात आहे. ‘कॉन्टॅक्ट अस’ वर क्लिक केल्यानंतर येणा-या ‘संपर्क अमेरिका’ ऐवजी आता ‘संपर्क जालना पोलीस’ असा मथळा येत आहे. मात्र, ‘अबाऊट अस’ मधील ‘विषयी एसपी आॅफिस जालना’वर क्लिक केल्यानंतर येणारा ‘विषयी अमेरिका’ हा मथळा कायम आहे. या मथळ्यातही बदल करण्याची गरज आहे.
पोलीस वेबसाईट दुरुस्तीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:01 AM