भोकरदन तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून राजूरची ओळख आहे. राजूर येथे मोठी बाजारपेठ असून, पंचक्रोशीतील ३० ते ४० गावांतील नागरिकांचा व्यवहार या गावाशी संलग्नित आहे. राजूर परिसरातील लोणगाव, उंबरखेडा, पळसखेडा पिंपळे, तुपेवाडी, चांधई एक्को, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चांधई टेपली या गावांतील ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरपंचपदाचे आरक्षण रद्द केल्याने इच्छुकांत कहीं खुशी, कहीं गम असे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील गावच्या निवडणुकीची रणनीती राजुरात आखली जात आहे. त्यामुळे गावागावांतील नागरिक गटागटाने चर्चा करताना दिसत आहेत. येथील हॉटेल, पानठेल्यावर निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगत आहेत. लोणगाव व चांधई ठोंबरी येथील प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात युवकांनी तिसरी आघाडी स्थापन केल्याने प्रस्थापित रणनीती व बारकाव्याकडे लक्ष ठेवून आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच प्रचाराला भर थंडीत ज्वर चढला आहे. चांधई ठोंबरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसह तरुणांनी अवैध दारूविक्रीच्या विरोधात आवाज उठवून राळ उडवून दिली आहे. सध्या होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थिगळखेडा वगळता अन्य ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व आहे.
कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:27 AM