खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:07 AM2019-09-23T01:07:54+5:302019-09-23T01:08:34+5:30
राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे.
\लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आता परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. अद्याप प्रचाराला प्रत्यक्ष प्रारंभ झाला नसला तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची कुठलीच संधी हे दोन्ही नेते सोडत नसल्याचे वास्तव आहे.
जालना विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खोतकर विरूध्द गोरंट्याल असाच सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे खोतकरांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली असून, त्यांनी ग्रामीण भागाची एक प्रचारफेरी पूर्ण केली असून, ते आता शहरात लक्ष ठेवून आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये एकमेकांवर आरोपांची संधी दोघेही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जालना पालिकेला निधी देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. गोरंट्याल यांच्या म्हणण्या प्रमाणे खोतकरांकडून जालना पालिकेला गेल्या पाचवर्षात कोणता निधी दिला याचे स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन त्यांनी गुडलागल्ली परिसरात एका विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले होते. त्यावरून खोतकरांकडून आम्ही शहर विकासासाठी राखीव पोलीस दलाच्या निवासस्थानासाठी अडीच कोटी रूपये दिले असून, रस्ते विकासासाठी विशेष बाब म्हणून सहा कोटी रूपये दिले आहेत, असे जाहीर केले. परंतु यावर पलटवार करताना गोरंट्याल यांनी रविवारी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरवा केल्याने त्यांनी शासन म्हणून निधीही दिला. परंतु तसे खोतकरांकडून निधी मिळाल्याचे ज्ञात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खोतकरांनी त्यांच्या भाग्यनगरमधील नाला दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपयांचा प्रस्ताव जालना पालिकेकडून मंजूर करून घेतला होता. परंतु प्रत्यक्षात हे काम आजही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने जकात नाके बंद केल्यावर त्याच्या तुलनेत निधी देऊ केला आहे. तोच निधी आपण दिल्याचे खोतकर सांगत असतील तर ती बाब चुकीची असल्याचे गोरंट्याल यांचे म्हणणे आहे.