भाजप सरकारने केले द्वेषाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:10 IST2019-02-09T00:10:32+5:302019-02-09T00:10:39+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे राज्यप्रमुख आ. रामहरी रुपनवार यांनी येथे बोलतांना केले.

भाजप सरकारने केले द्वेषाचे राजकारण
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षात रसातळाला नेले आहे. व्देषाचे राजकारण करुन समाजात फूट पाडण्याचे काम सरकारने केले असून, कॉंग्रेस पक्षाने सातत्याने सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समतेच्या विचाराची मोट बांधली आहे, हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन संवाद कार्यकर्ता
प्रशिक्षण शिबिराचे राज्यप्रमुख आ. रामहरी रुपनवार यांनी येथे बोलतांना केले.
जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी येथील श्री गुरु गणेश मंगल कार्यालयात आयोजित एक दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तर माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथलिया, संतोषराव दसपुते, भीमराव डोंगरे, डॉ. संजय लाखे पाटील, विजय कामड, ज्ञानेश्वर भांदरगे, सत्संग मुंडे, अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे प्रशिक्षक राजीव साहू, लेखा नायर, विनोद नायर, नवशाद परमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अ. भा. कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उपस्थित प्रशिक्षकांनी कॉंग्रेस पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि मोदी सरकारची खोटी आश्वासने, मोदींची जुमलेबाजी, चित्रफितीतून भाजपा सरकारचा खरा चेहरा उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला.