अनुदान देण्याची मागणी
जालना : तालुक्यातील विरेगाव महसूल मंडळातील उटवद परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली आहे, परंतु लागवडीनंतरही कृषी विभागाकडून अद्याप या भागातील लाभार्थ्यांना लागवड अनुदान देण्यात आले नसल्याच्या तक्रारी आहेत.
पादचाऱ्यांची गैरसोय
बदनापूर : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी रस्ता शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे, शिवाय भुरट्या चोऱ्याही वाढल्या आहेत. ही बाब पाहता, नगरपंचायतीने बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
अवैध गुटखा विक्री
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे. शासनाने गुटखा विक्री, वाहतुकीवर कायदेशीर बंदी घातली आहे, परंतु हे बंदी आदेश झुगारून अनेक जण अवैधरीत्या व्यवसाय करीत आहेत. संबंधित विभागाने गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तुंबलेल्या नाल्यांकडे दुर्लक्ष
परतूर : शहरांतर्गत विविध भागातील नाल्या तुंबल्या आहेत. थोडाही पाऊस झाला की, या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत आहे. अस्वच्छ पाण्यातूनच नागरिकांना वाट शोधावी लागत आहे. ही बाब पाहता, पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.