पवन कुमार
वडीगोद्री (जि. जालना) : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करू, असे लेखी आश्वासन शासनाने दिल्यानंतर वडीगोद्री (ता. अंबड) येथे सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी तात्पुरते स्थगित केले. तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. परंतु, आंदोलन थांबलेले नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले, तर जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करताना, छगन भुजबळ यांनी ओबीसींना विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे, अशी मागणी केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर मागास प्रवर्गातील मागण्यांबाबत चर्चा झाली. काही मागण्यांवर निर्णय घेण्यात आले, काही बाकी आहेत. ज्या मागण्या बाकी आहेत, त्या पूर्ण करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे सरकारने म्हटले आहे.
आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेतही आरक्षण हवे : भुजबळ- आम्ही जातिवाद केला नाही. त्याला एवढे माहिती नाही की विधानसभेत, लोकसभेत आम्हाला आरक्षण नाही. आता आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेतही आरक्षण हवं आहे.- आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या, त्यांना दुसरं आरक्षण द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार : मुंडे - आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणाच्या मागण्या शुक्रवारच्या बैठकीत मांडल्या. जे जे विषय त्या बैठकीत मांडले ते शासनाने गांभीर्याने घेतले आहेत.- नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने एका विशिष्ट आंदोलनाबाबत घेतलेल्या निर्णयाचा परिपाक या वडीगोद्रीत झाला आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार आहे, असे आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.