महावितरणकडून कृषिपंपांच्या थकीत वीज बिलासाठी गत पाच दिवसांपासून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रबीतील हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, शेतकऱ्यांना बिले भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींकडून आंदोलने केली जात आहेत. जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे व १३ गावांतील सरपंचांनी भोकरदन येथील वीज वितरण कार्यालयात जाऊन अभियंता दीक तुरे यांची भेट घेतली. वीजपुरवठा पूर्ववत सुरू न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. उपस्थितांशी चर्चा झाल्यानंतर तुरे यांनी १३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. यावेळी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, सरपंच सतीश शेळके, भगवान गिरणारे, एम.के. मुगटराव, नायबराव कढवणे, विकास वाघ, ॲड. रवींद्र साबळे, गजानन वराडे, सचिन वराडे, पप्पू ठोंबरे, विशाल ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना दिलासा
अभियंता तुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केदारखेडा, मेरखेडा, बामखेडा, बरंजळा लोखंडे, बरंजळा साबळे, वालसा, डावरगाव, कोदोली, लिंगेवाडी, खापरखेडा, तडेगाव, नळणी, जवखेडा ठोंबरे, गव्हाण संगमेश्वर आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कोमेजणाऱ्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
फोटो