जालना :
तालुक्यातील सामनाव शिवारातील गट क्रमांक ३३९ मधील एका विहिरीत शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास एका प्रेमी युगुलाने उडी घेतली. विहिरीत पाणी कमी असल्याने दोघेही पाईपला धरून बसले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांसह तालुका पोलिसांनी दोघांना विहिरीतून बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली.शहरातील रेल्वेस्थानक परिसरातून दोन बहिणी शुक्रवारपासून बेपत्ता आहेत. यातील एकजण अल्पवयीन आहे. या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी कदीम ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तपास सुरू असताना सदर मुली सामनगाव शिवारात असल्याची माहिती कदीम पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुलींचे नातेवाईक व पोलीस सामनगाव शिवारातील एका शेतात पोहचले. तेथील एका व्यक्तीसह शेतात दोन्ही मुली होत्या. मुलींचे नातेवाईक परिचित असल्याने तो घाबरला. त्यानंतर त्या व्यक्तीसह मोठ्या मुलीने शेतातील एका विहिरीत उडी घेतली.मात्र, विहिरीत पाणी कमी असल्याने दोघेही पाईपला धरून बसले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. तालुका ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दोरी विहिरीत सोडून दोघांना पाण्यातून बाहेर काढले. दोघांना किरकोळ मार लागला असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्याचे सहायक निरीक्षक वडते यांनी सांगितले. या प्रकरणी तालुका ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.