लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जालना पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जिल्ह्यातील १२२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर ४८४ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. १६८ दारूविक्रेत्यांवर कारवाई करून ५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर परवानाधारक ५६९ शस्त्रेही पोलिसांनी जमा करून घेतली आहेत.विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपॉइंट सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विविध गुन्ह्यांत असलेल्या जिल्ह्यातील १२२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर ४८४ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. शिवाय अवैध दारूविक्री करणाऱ्या १६८ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संबंधित दारूविक्रेत्यांकडून ५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठीही पोलीस दलाच्या वतीने विशेष तयारी केली जात आहे. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, फौजदारांसह कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील २७ पोलीस अधिकारी, ११०० होमगार्ड, ३०० कर्मचारी, सीआरपीएफच्या पाच कंपनीही बंदोबस्तकामी तैनात केल्या जाणार आहेत.मतदानाच्या दिवशी सेक्टर पेट्रोलिंगची १०० पथके जिल्ह्यात कार्यरत राहणार आहेत. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पथकेही तैनात केली जाणार असून, त्यांच्यासमवेत इतर कर्मचारी बंदोबस्त कामी कार्यरत राहणार आहेत.
१ हजार २२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:00 AM