- संजय देशमुख (जालना)
गेल्या महिनाभरामध्ये डाळींमध्ये आलेली तेजी आता हळूहळू कमी होत असून, हरभरा आणि तूर डाळीत क्विंटलमागे अनुक्रमे ४०० आणि २०० रुपयांची घट झाली आहे. एकूणच बाजारपेठेत ग्राहकी नसली तरी तुरीची आवक वाढली असून, तुरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती तीव्रपणे जाणवत आहे. ज्वारी (२०० पोती आवक असून, भाव २५०० ते ३२००) मध्ये ३०० रुपयांनी क्विंटलमागे भाव कमी झाले आहेत. बाजरीची बाजारपेठेत आवक ३०० पोती असून, १३०० ते २१०० रुपये असे भाव क्विंटलमागे मिळत असून, यात १०० रुपयांची घट झाली आहे. जालना येथील मोंढ्यात मक्याची आवक कायम असून, ३ हजार पोती मका येत असून, त्याच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या १५०० ते १६५० रुपये क्विंटलने खरेदी होत आहे. नवीन तूर बऱ्यापैकी येत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक नगण्य आहे. सध्या तुरीचे भाव ४५०० ते ५३०० रुपये असून, यात १०० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनची आवक ५०० पोती असून, ३३०० रुपयांचा भाव कायम आहे. नवीन हरभरादेखील बाजारपेठेत दाखल होत असून, दररोज ५०० पोती आवक आहे. त्याचे भाव ३८०० ते ४४०० आहेत. गुळाची आवकही जालना बाजारपेठेत चांगली असून, दररोज ३००० भेली येत आहेत. त्याचे भाव सरासरी ३१०० रुपये एवढे आहेत. गावरान गुळाला मोठी मागणी असून, त्याचे दरही दररोज वाढत आहेत.हरभरा डाळीचे भाव सध्या ५६०० ते ५७०० रुपये क्विंटल आहेत. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४०० रुपयांची घट झाली आहे. तूर डाळीचे भाव ६१०० ते ६२०० रुपये क्विंटल असून, यामध्येही २०० रुपयांची घट झाली आहे. मूग डाळीचे भाव ७२०० रुपये क्विंटल आहेत. मसूर डाळीतही घट झाली असून, सध्या ४८०० क्विंटलने विक्री होत आहे. साखरेसंदर्भात सरकारचे धोरण निश्चित नाही. साखरेच्या दरात ५० रुपयांची क्विंटलमागे घट झाली आहे. अनेक साखर कारखाने एफआरपीच्या मुद्यावरून अडचणीत आल्याने मिळेल त्या भावात साखर गोदामाबाहेर काढत आहेत. साखरेचा हमीभाव हा २९०० रुपये ठरवून दिला आहे. भुसार मालाच्या उलाढालीसोबतच मोंढ्यात सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी गेल्या १५ दिवसांमध्ये या केंद्रावर केवळ २००० क्विंटल एवढा अत्यल्प कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला आहे. नाफेडने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर अद्याप प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही. सध्या कुठलाच मोठा सण नसल्याने बाजारपेठेत निरुत्साही वातावरण आहे. किराणा मालामध्ये पाहिजे तशी तेजी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तेल, तुपाच्या दरातही पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. पोहे, मुरमुरे, रवा आदींच्या कि मतीही स्थिर होत्या. नारळाच्या भावातही घट झाली असून, ६० नारळांच्या पोत्याचे दर ७०० रुपये आहे. यात १०० रुपयांची घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.