जालना भाजी बाजारामध्ये सर्वच भाज्यांची आवक बऱ्यापैकी असली तरी भाज्यांना उठाव नसल्याने सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. बाजारपेठेत शिमला मिरची, कोथिंबीर, वांगी, तसेच टोमॅटो यांची आवक वाढलेली आहे. शेवग्याच्या शेंगा, तसेच वाटाण्याला मागणी असल्याचे दिसून आले. गवार, फुलकोबी, पत्ताकोबी, पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
भेंडी आणि कांदा या दोन्ही घटकांना मागणी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर काही प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतकऱ्यांकडून अत्यंत मातीमोल भावाने खरेदी केला जाणारा भाजीपाला बाजारात चढ्या भावात विकला जात होता. यात मेथी १० रुपयांना २ जुडी, शेपू १० रुपयांना २ जुडी, पालक १० रुपयांना २ जुडी भावाने विक्री होत होता. शासन निर्णयाविरोधात बाजार समितीत बंदची पार्श्वभूमी असल्याचा परिणामही जाणवला. फळांचे भाव वाढलेले होते.