रस्त्याची दुरवस्था
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री-भांबेरी या १० किलोमीटर असलेल्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा रात्री-अपरात्री रस्त्यावर किरकोळ अपघात घडण्याचेही प्रमाण वाढले आहे. वेळीच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
शिष्यवृत्ती अर्जाचे व्हेरिफिकेशन महत्त्वाचे
जालना : जिल्ह्यातील लाभार्थी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जांचे व्हेरिफिकेशन मुख्याध्यापकांनी तातडीने करावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यात नोडल लॉगिन करून प्रथम रिन्युअल फॉर्म व्हेरिफिकेशन करावा, विद्यार्थी आपल्याच शाळेचे आहेत का? ते तपासून पाहावे, असेही सांगण्यात आले आहे.
शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन
देऊळगाव राजा : पाचवी ते आठवी दरम्यानचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व शाळांनी शासन नियमांचे पालन करूनच वर्ग भरवावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. शिवाय शिक्षकांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.