लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : येथील रहिवासी सोमनाथ रामनाथ सागडे यांच्या घरावर सहकार विभागाच्या अंबड येथील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली. सागडे यांच्या घरात अनेक बँकांचे धनादेश, कोरे बॉण्ड तसेच अनेकांकडून लिहून घेतलेल्या शेतजमिनीची कागदपत्रे सापडली आहेत. यातील सत्यता तपासून पाहिली जात असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.२१ जून रोजी सहकार विभागाला बाबासाहेब रावसाहेब रोडी, ज्ञानेश्वरी शिवाजी लष्करे आणि सुनील प्रकाश रावस यांनी सागडे विरुध्द आॅनलाइन तक्रार केली होती. त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अंबड येथील सहकार विभागाचे तालुका निबंधक देवरे तसेच सहकार अधिकारी अनिता तायडे व अन्य कर्मचाºयांनी सागडे यांच्या अंकुशनगर येथील घरावर छापा टाकला. यावेळी केलेल्या तपासणीत सागडे यांच्या घरी विविध बँकांचे पासबुक, धनादेश आणि कोरे बॉण्ड तसेच काही बॉण्डवर लिहून घेतलेल्या शेतजमिनी, प्लॉट यांचा समावेश असल्याचे दिसून आले. याचा खुलासा सागडे यांना करता आला नाही. आज केवळ आम्ही कागदपत्रे जप्त केली असून, त्यातील तथ्य तपासून पाहण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.