बदनापूर ( जालना): शहरा जवळ आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक खाजगी बस उलटून त्यांनतर बसवर एक ट्रक आदळून भीषण अपघात झाला. यात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे.
याबाबत माहिती अशी, बालाजी ट्रॅव्हल्सची पुण्याहून रिसोडकडे जात असलेली खाजगी बस बदनापूर शहराजवळ जालना रोडवर अचानक उलटली. त्यानंतर औरंगाबादहून जालनाकडे जाणारा एक ट्रक सुद्धा या बसवर आढळला. या भीषण अपघातात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी प्रवाशांना जालना येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातामुळे जालना औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक दोन ते अडीच तास विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जारवाल गोपाल बारवाल, विशाल काळे, ज्योती खरात, आरती रणदिवे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला अपघात? पहाटे पाऊस सुरू होता. दरम्यान, भरधाव वेगात एका ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस उलटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर या महामार्गावर दुभाजकावर लावलेले लोखंडी बॅरिकेट्स तुटले होते.