जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम असून, निर्बीजीकरणाच्या विषयाला अद्याप पालिकेकडून मंजुरी मिळालेली नाही.
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील नागरिक जखमी होत आहेत. हा विषय नगरपालिकेच्या विविध सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी आला. त्यावर चर्चाही झाली. परंतु, प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा विषय आजही मार्गी लागलेला नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गापासून अंतर्गत भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
शहरवासीय झाले त्रस्त
शहरातील बहुतांश भागातील मुख्य मार्गासह अंतर्गत भागातील रस्त्यांवरही मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. हे कुत्रे अचानक हल्ला करीत असल्याने महिलांसह आबालवृद्ध जखमी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी शहरातील नागरिकांनी केली आहे; परंतु, पालिका प्रशासनाकडून त्यासाठी उपाययोजना केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
चालक हैराण
शहरातील मुख्य मार्गावरील मोकाट कुत्र्यांचा वावर आणि मोकाट जनावरे यामुळे वाहनचालकांचीही कसरत होत आहे.
नूतन वसाहत भागात हैदोस
जालना शहरातील नूतन वसाहत, गरीबशहा बाजार, बसस्थानक परिसर, औरंगाबाद चौफुली, कन्हैय्यानगर, मंठा चौफुली, सिंधीबाजार, गांधीचमन, रेल्वे स्टेशन रोड, आदी भागांत मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.
रुग्णालयात दैनंदिन १५ ते २० जखमी
शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या आबालवृद्धांसह महिलांची संख्या मोठी आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात, आंतररुग्ण विभागात दैनंदिन १५ ते २० जखमी रुग्ण उपचारासाठी येतात.
नगरपालिकेचे प्रयत्न सुरू
मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या विषयाला सभेची मान्यता घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल.
- नितीन नार्वेकर
मुख्याधिकारी, नगरपालिका