केदारखेडा : येथील श्री. केदारेश्वर ग्राम विकास पॅनल प्रमुख संदीप शेळके यांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ते गावात येताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांची उधलण करून स्वागत केले. शिवाय त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या दिमतीला असलेली आलिशान गाडी गावात चर्चेचा विषय बनला होता. यावेळी चार गाड्यांसह डिजेच्या निनादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांचीही आतषबाजी करण्यात आली.
गावात येताच संदीप शेळके यांनी केदारेश्वर मंदिरात श्री. केदारेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. केदारेश्वर मंदीरापासून सुरू झालेली ही मिरवणूक रामनगर येथे तीन तासानंतर विसावली. दरम्यान, ग्रामस्थांनी त्यांच्यावर विविध ठिकाणी दिड क्विंटल फुलांची व गुलालाची उधलण केली. सुवासनींनी जागोजागी त्यांचे औक्षण केले. संदीप शेळके यांनी भाजप पुरस्कृत गावात श्री. केदारेश्वर ग्राम विकास पॅनलची स्थापना केली होती. यात ११ पैकी सर्वच उमेदवार त्यांच्या पॅनलचे विजयी झाले आहेत. परंतु, मतमोजणी झाली त्यावेळी शेळके रूग्णालयात उपचार घेत असल्याने गावात जल्लोष साजरा करण्यात आला नव्हता.