दिल्लीतील एका कंपनीकडून भविष्यातील ऑक्सिजनची गरज आणि रुग्णांची काळजी यातून आम्ही वडील डाॅ. शंकरराव राख, आई डॉ. कृष्णाताई राख यांच्या दूरदृष्टीतून त्या काळात २० लाख रुपये खर्च करून हा प्लांट उभारल्याचे डॉ. संजय राख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आज कुठेच ऑक्सिजन पैसे देऊनही सहज उपलब्ध होत नसताना आमच्या या प्लांटमधून दररोज साधारणपणे ८० सिलिंडर ऑक्सिजन मिळत आहे. तो आम्ही अति गंभीर अशा ८० रुग्णांना देत असून, काही अति महत्त्वाच्या आणि न टाळता येणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी तो वापरत असल्याचे राख म्हणाले.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर
आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हवेतून ऑक्सिजन खेचण्याचा प्लांट उभारणीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात असल्याचे म्हणाले. आम्ही हा ऑक्सिजनचा प्लांट दहा वर्षांपूर्वी उभारला आहे. त्यासाठ कंप्रेसरच्या माध्यमातून वातावरणातील ऑक्सिजन शोषला जातो. त्यात नायट्रोजन आणि कार्बनडाय ऑक्साइडही शोषला जातो; परंतु प्लांटमधील वेगवेगळ्या फिल्टर यंत्रणेतून ऑक्सिजनचे विलगीकरण केले जाते आणि शुद्ध ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना दिला जातो.
-डॉ. संजय राख, व्यवस्थापकीय संचालक, दीपक हॉस्पिटल तथा कोविड केअर सेंटर, जालना.