जालना : अचानक लागलेल्या आगीत शहरातील नगर पालिकेतील मालमत्ता विभागातील महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेनंतर पालिकेने तीन सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
जालना नगर पालिकेतील कर्मचारी बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर कार्यालय बंद करून गेले होते. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या मालमत्ता विभागाला आग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत मालमत्ता कर विभागातील दस्तऐवज जळून खाक झाले. विशेष म्हणजे या विभागात नागरिकांनी नोंदविलेल्या आक्षेपांचे महत्त्वाचे दस्तऐवज होते. परंतु, हे दस्तऐवजही या आगीत भस्मसात झाले. घटनास्थळाला मुख्याधिकारी नितीन नार्वेकर व इतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीतची नोंद करण्यात आली आहे.
चौकशी सुरू आहे
आगीच्या प्रकरणात तीन सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील अनेक बाबी समोर येतील. शिवाय ही आग कशामुळे लागली व नेमके कारणीभूत कोण याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, जालना