जालना/ वडीगोद्री : दोदडगाव ता. अंबड येथे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मंडल स्तंभाची स्थापना केली आहे. त्यामुळे ओबीसी समाजासाठी ही एक स्वाभिमानाची बाब आहे. या परिसराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी माजी खासदार तथा अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस राजीव सातव यांच्याकडे केली. तसा प्रस्ताव माझ्याकडे द्यावा, आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यासाठी तरतूद करू, अशी ग्वाही सातव यांनी दिली. माजी आमदार नारायण मुंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी दोदडगाव येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शार्दूल’ या नारायण मुंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाचे यावेळी प्रा. श्रावण देवरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. देवरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, राज्य सरकारने दोदडगावच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा विशेष निधी द्यावा. जेणेकरून या परिसराचा एक पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल. ओबीसी समाजाला महत्त्व आणि न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज देवरे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर यांचीही उपस्थिती होती. जानकर यांनी दोदवड गावच्या विकासासाठी दहा लाख रूपयांचा निधी जाहीर केला. माजी खासदार सातव म्हणाले, ओबीसींना आम्ही न्याय देऊ. जानकरांनी आता आमच्याकडे यावे. तुमच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले. यावेळी यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी ओबीसी प्रश्नावर आपण संसदेत आणि विधीमंडळात अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु, ओबीसींच्या मुद्यावर चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच वरिष्ठ जातींनी लहान घटकांना सोबत घेऊन जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच एनआरसी आणि सीएए कायद्यामुळे अशांतता पसरत असल्याचेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आमचे हक्क हिरावून घेऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले. आगामी जनगणनेच्यावेळी ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी ओबीसीच्या जनगणनेसंदर्भातील ठराव पाठवून जी मदत केली, ती महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक सत्संग मुंडे यांनी केले. यावेळी माजी आमदार शिवाजी जोते, माजी मंत्री बदामराव पंडित, सुशीला मोराळे आदींची उपस्थिती होती.
मंडल स्तंभ परिसर विकासाचा प्रस्ताव द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:56 AM