विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याची संख्या मात्र, तोकडी आहे. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवीन १० पोलीस ठाण्यांसह एका चौकीच्या निर्मितीसाठी दाखल केलेले प्रस्ताव ८ वर्षांपासून शासकीय लाल फितीत अडकले आहेत. १९ लाख ५८ हजार लोकसंख्येच्या जालना जिल्ह्यात केवळ १७५० च्या आसपास पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ११०० नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस कर्मचारी पाहावयास मिळत आहे.खून, दरोडा, चो-या, अपघात असोत किंवा मोर्चे, आंदोलने, निवडणुका, नेत्यांच्या सभा असोत सर्वत्र पोलीस बंदोबस्त लागतोच! सण-उत्सवाच्या काळातही पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. १९ लाख लोकसंख्येच्या जालना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालय, चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह १८ पोलीस ठाण्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस दलात जवळपास १८०० पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची पदे मंजूर आहेत. पैकी जवळपास १७५० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. याच अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर आंदोलने, मोर्चा, निवडणुका, मंत्र्यांच्या दौ-याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आहे. अपु-या संख्येमुळे पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांची उकल करताना कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांच्या नाकी नऊ येत आहेत. वाढणारी लोकसंख्या आणि गुन्ह्याचे प्रमाण पाहता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २०११ पासून नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. २०११ मध्ये ६ तर २०१२ मध्ये ४ पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तर २०१३ मध्ये परतूर अंतर्गत सातोना पोलीस चौकीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. वेळोवेळी शासनाकडे अहवालही सादर केला जातो. मात्र, शासकीय पातळीवर मागील आठ वर्षांपासून नवीन १० पोलीस ठाणे निर्मितीच्या प्रस्तावाचे भिजत घोंगडे प्रशासकीय दरबारी पडून आहे. वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी पाहता नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळणे गरजेचे आहे.असे आहेत नवीन ठाण्यांचे प्रस्तावजिल्हा पोलीस दलाच्या वतीने दहा नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करण्यात आले आहेत.यात २०११ मध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे, मार्केट यार्ड, कादराबाद, तीर्थपुरी, शहागड, राजूर येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हावी, यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले.तर २०१२ मध्ये वाटूर, वाघ्रूळ, अंबड ग्रामीण, कुंभार पिंपळगाव येथे नवीन पोलीस ठाणे व्हावे म्हणून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
१० नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव ८ वर्षापासून लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 1:03 AM