भोकरदन ( जालना ) : भोकरदन-जालना रोडवरील जवखेडा ठोबरे शिवारात असलेल्या हॉटेल प्रकाशगड येथे देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत उघडकीस आले. यावेळी दोन महिलांसह हॉटेलच्या मॅनेजरला भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईनंतर दोन्ही महिलांची जालना येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, भोकरदन-जालना रोडवरील हॉटेल प्रकाशगड येथे महिला देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी येतात याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांना मिळाली होती. पोलिसांनी 24 जूनच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. यावेळी दोन महिला व पाच आंबटशौकीन ग्राहक हॉटेलच्या खोलीत थांबले होते. पोलिस आल्याची चाहूल लागताच पाचही ग्राहकांनी पळ काढला. यावेळी सिल्लोड येथील 45 व 46 वर्ष वयोगटातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच भोकरदन येथील दिवाणी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. तसेच हॉटेलचा मॅनेजर अशोक दगडूबा राऊत ( 40 ) याला अटक केली आहे. हॉटेल मालक प्रकाश ठोबरे याच्या विरूद्ध कलम 3 व 4 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध(पिटा) 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शालिनी नाईक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार, आर के तडवी, वाय.एस. पाडळे, व्ही. के. बावस्कर एस एम शिंदे, एस एम केंद्रे, रुस्तुम जैवळ, अनिल सवडे, अरुण वाघ,अभिजित वायकोस, सतिष लोखंडे, गणेश पिंपळकर यांनी केली.