लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : दुधाचे दर वाढवण्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनूदान देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ राजूर येथे गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. नायब तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खा.राजू शेट्टी यांनी गेल्या चार दिवसांपासून राज्यात दुधाचे दर वाढवण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. परंतू शासन याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने दिवसेंदिवस स्वाभिमानी कडून आंदोलन तीव्र होत आहे. आज राजूर चौफुलीवर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, राजू जगताप, देवकर्ण वाघ, सदाशिव जायभाये, डॉ.वैजीनाथ ढोरकुले यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य शासनावर कडाडून टीका केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच निवडणुकीत शेतकºयांना अच्छे दिन येणार असल्याची भाषा वापरणारे आता मूग गिळून गप्प असून निव्वळ उद्योगपती व शासनकर्त्यांनाच अच्छे दिन आल्याचे शेवाळे म्हणाले. जगाच्या पोशिंंद्यावर आत्महत्येची वेळ येत असल्याने शासन काय करीत आहे, असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित केला. शेतक-यांना पीककर्जासाठी बॅकांत चकरा माराव्या लागत असून पीकविमाही सुरळीत मिळत नसल्याने शेतक-यांना अच्छे दिन येणार कसे, असे ते म्हणाले. गेल्या चार दिवसांपासून दूध दरवाढीसह अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू असताना अद्याप काहीच मार्ग निघाला नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तातडीने मार्ग न निघाल्यास स्वाभिमानीच्या वतीने आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात बंजारा टायगर्स व छावा संघटनेने सहभागी होत, पाठिंबा दिला होता. सुमारे एक तास रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. यावेळी नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.सांजोळ, जाफराबाद येथे रास्ता रोकोजाफराबाद : जाफराबाद - चिखली सीमेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, जाफराबाद यांच्या वतीने सांजोळ (ता.जाफराबाद) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडले. संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. याचे पडसाद म्हणून गुरुवारी जाफ्राबाद चिखली मुख्य मार्गावर बैलगाडी, गायी, म्हशी घेऊन ठिय्या धरुन बसले. जोपर्यत दूध उत्पादकांना ५ रूपये प्रतिलिटर अनुदान मिळत नाही तोपर्यत आंदोलन चालूच राहणार. यावेळी मयूर बोर्डे, प्रेमसिंग धनावत, योगेश पायघन, अनिल वाकोडे, संतोष परिहार, रामेश्वर परिहार कैलास राऊत, भगतसिंग लोदवाळ, सुनील धावणेसह कार्यकर्त्याना अटक करून सोडून देण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी हजर होते.
राजूर, जाफराबाद येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:13 AM