लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील कृषिपंपाचा खंडित वीजपुरवठा जोडण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतक-यांनी शनिवारी बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे अंबड-पाथरी रस्त्यावरील वाहतूक तीस तास ठप्प झाली.कुंभार पिंपळगाव शिवारातील कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतक-यांनी उपअभियंत्यांकडे विचारणा केली होती. त्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसारच वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे उपकार्यकारी अधिकारी एम. डी. लिमजे यांनी सांगितले. परंतु राज्यात मागणीएवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषीपंपधारकांना दिवसा आठ व रात्री दहा तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करावा. वीज पुरवठा खंडित करू नये, अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी आंदोलनकर्त्या शेतक-यांनी केली.यावेळी शेषराव आर्दड, बाबासाहेब तांगडे, विश्वंभर भानुसे, भास्कर तांगडे, कल्याण आर्दड, ज्ञानेश्वर आर्दड, भगवान तौर, रामेश्वर वरकड, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध शिंदे, विनय गुजर, रामेश्वर गोरे, शिवाजी कंटुले, पांडुरंग कंटुले, विजय कंटुले, मुंजाबा तांगडे, बाळासाहेब तांगडे, रमेश तौर, विठ्ठल तौर, विलास राठोड, विष्णू गोरे, मदन पवार यांची उपस्थिती होती.
वीज जोडणीसाठी संतप्त शेतक-यांचा रास्ता रोको; ३ तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:30 AM